मुंबई

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी सेवानिवृत्त; कोविड काळात मोलाचे योगदान

कोविड विषाणू संसर्ग कालावधीत आरोग्य खात्याची धुरा वाहतांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त  सुरेश काकाणी यांनी दिलेले योगदान शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. फक्त कोविडच नव्हे तर इतर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी देखील त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे ठरले, असे गौरवोद्गार महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी काढले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी हे शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार  ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. त्याप्रीत्यर्थ सुरेश काकाणी यांचा महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ प्रदान करुन सत्कार करण्यात आला. त्यांचा कार्यालयीन कामकाजाचा २९ एप्रिल रोजी शेवटचा दिवस असल्याने महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त सभागृहात हा छोटेखानी समारंभ पार पडला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, सहआयुक्त  अजीत कुंभार यांच्यासह विविध सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सुरेश काकाणी यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून दिलेल्या योगदानाचा विस्तृत उल्लेख केला. काकाणी यांचा शांत, संयमी, मृदू स्वभाव, कामकाजाचा कितीही तणाव असला तरी डोके शांत ठेवून काम करण्याची सवय यामुळे कोविड कालावधीत आरोग्य खात्याला योग्य अधिकारी लाभला. एक सहकारी म्हणून काम करताना कधीही प्रतिवाद न करणे, कधीही निराश न होणे, प्रत्येक गरजेच्या वेळी उपलब्ध असणे, प्रत्येक दूरध्वनी आणि संदेशाला प्रतिसाद देणे आणि विशेष म्हणजे कामकाजात अत्यंत व्यस्त असूनही दिलेल्या वेळेत प्रत्येक काम पूर्ण करणे या सर्व गुणांचा मिलाफ काकाणी यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे, त्यासोबत त्यांनी आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता देखील जोपासली आहे, त्यामुळे ते सर्वार्थाने उजवे ठरतात, असे कौतुकही डॉ. चहल यांनी केले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, सह आयुक्त सुनील धामणे आदी मान्यवरांनी देखील  काकाणी यांच्या सोबत केलेल्या कामकाजाच्या आठवणी सांगितल्या. कामकाजाचा थोडाही तणाव जाणवू न देता, पूर्णपणे झोकून देत, शांतचित्ताने आणि अतिशय पद्धतशीररीत्या कामकाजाची धुरा वाहणे, मृदू संभाषण या काकाणी यांच्या व्यक्तिमत्व विशेषांचा सर्वच मान्यवरांनी आवर्जून उल्लेख केला. कोविड व्यवस्थापन करताना महानगरपालिका प्रशासनाचा कणा बनून श्री. काकाणी खंबीरपणे कार्यरत राहिले आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजाला योग्य दिशा मिळत गेली, असा सूर यातून उमटला.
सत्काराला उत्तर देताना सुरेश काकाणी म्हणाले की, कोविडसारख्या वैश्विक आपत्तीतून मुंबई महानगर तावून-सुलाखून बाहेर पडले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका किती जागरूक, सतर्क आणि तत्पर आहे, हे फक्त मुंबईनेच नव्हे तर संपूर्ण राज्याने, देशाने आणि जगाने देखील पाहिले. कोविडचे व्यवस्थापन करताना महानगरपालिकेत आयुक्तांपासून शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरले. संपूर्ण आरोग्य यंत्रणेसोबत सर्व नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, कॉर्पोरेट, प्रसारमाध्यमं अशा सर्वच घटकांनी मनापासून आणि एकजुटीने काम केले. आधी कोविडचे रुग्ण आपल्याकडे येत होते, नंतर महानगरपालिका थेट घरोघरी जाऊन प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचू लागली. अश्या बदलातून आपण काय आहोत, किती उत्कृष्ट काम करू शकतो, हे महानगरपालिकेने सिद्ध करून दाखवले. कोणतेही काम करताना त्यात समर्पित भावनेने, झोकून देऊन काम केले तर काहीही कठीण नाही. प्रत्येकाने आपल्या कारकिर्दीत आणि आयुष्यात ही गोष्ट स्मरणात ठेवून कार्यरत राहिले पाहिजे, असे सांगून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कामकाज करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य शासनाचे देखील काकाणी यांनी विनम्रपणे आभार मानले.
समारंभाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close