टाॅप न्यूज

मुंबई महानगरासाठी ‘दि सिटी फिक्स लॅब्ज निसर्ग आधारित उपाययोजना’ या उपक्रमाचा शुभारंभ

वातावरण बदलाच्या आव्हानावर मात करण्यासाठी मानवाच्या हाताशी किती वेळ आहे, याचे भाकीत कोणीही करु शकत नसले तरी लवकरात लवकर आणि मुख्य म्हणजे निसर्ग पद्धतील अनुसरुन उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरासाठी कार्यान्वित होत असलेला ‘दि सिटी फिक्स लॅब्ज – निसर्ग आधारित उपाययोजना’ हा उपक्रम मुंबईसाठी तर महत्त्वाचा आहेच, पण त्यातून जगालाही मार्गदर्शक ठरु शकतील, अशा उपाययोजना देणारे स्टार्ट अप तयार झाले पाहिजेत, अशी अपेक्षा राज्याचे पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीत ‘दि सिटी फिक्स लॅब्ज – निसर्ग आधारित उपाययोजना’ या उपक्रमाचा शुभारंभ सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे  २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. वातावरण बदलांना सामोरे जाताना निसर्ग आधारित उपाययोजना करुन शाश्वत स्वरुपाच्या मुंबई महानगराची जडणघडण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशाखाली, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय इंडिया) यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करताना मुंबई विद्यापीठ आणि टाटा समाज विज्ञान संस्था यांचेदेखील सहकार्य लाभणार आहे.
या शुभारंभ कार्यक्रमास प्रख्यात पर्यावरणवादी पद्मश्री तुलसी गौडा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावली. तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, सह आयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार, टाटा समाज विज्ञान संस्थेच्या संचालक, कुलगुरु श्रीमती शालिनी भारत, अधिष्ठाता श्रीमती अमिता भिडे, महानगरपालिकेचे उप आयुक्त (पर्यावरण) सुनिल गोडसे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी, मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु राजेश कुलकर्णी, रोटरी इनर व्हील क्लब ऑफ मुंबईच्या श्रीमती निधी चतुर्वेदी व इतर मान्यवर उपस्थित होते. डब्ल्यूआरआय इंडिया संस्थेच्या संचालक (नागरी विकास) जया धिंडाव यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे तर संस्थेच्या कार्यक्रम प्रमुख लुबायना रंगवाला, ग्रीन योद्धा उपक्रमाचे कार्यक्रम व्यवस्थापक सिद्धेश डहुस्कर हे प्रत्यक्ष उपस्थित होते.
नेचर बेस्ट सोल्युशन्स ऍक्सीलेरेटर उपक्रमाविषयी माहिती
महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने दि सिटी फिक्स लॅब्ज – निसर्ग आधारित उपाययोजना उपक्रमाची मुहूर्तमेढ.
वातावरण बदलांना सामोरे जात, वातावरण बदल सक्षम व शाश्वत विकासाच्या दिशेने जाणारे शहर घडविण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविणार.
पाणी टंचाई, पूरस्थिती, तापमान वाढ, हवेतील प्रदूषण, हरित क्षेत्रामध्ये घट यासारख्या पर्यावरण विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना.
हवा, पाणी, हरित क्षेत्र यांच्या आधारेच म्हणजे निसर्ग आधारित पद्धतींचाच उपयोग करुन अभिनव उपाययोजना शोधून काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न.
असे प्रयत्न करण्यासाठी संबंधित घटकांना निमंत्रित करुन त्यांना शासनासमवेत सहभागी करुन घेत सहाय्य करणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close