टाॅप न्यूज

कचरा व्यवस्थापनामध्ये मुंबई देशात पहिली

मुंबई : प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या वतीने आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेमध्ये, चाळीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या श्रेणीत, घनकचरा व्यवस्थापनातील ‘नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी’ साठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बृहन्मुंबई महानगर पालिकेला प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली मध्ये विज्ञान भवन येथे शनिवारी, २० नोव्हेंबर झालेल्या समारंभात, गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी हा पुरस्कार प्रदान केला. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संगीता हसनाळे, उपायुक्त (परिमंडळ ७) भाग्यश्री कापसे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) अशोक यमगर, कार्यकारी अभियंता (स्वच्छ भारत अभियान) अनघा पडियार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी घनकचरा व्यवस्थापन खात्याचे अभिनंदन केले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याकडून दर वर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा सन २०२१ च्या स्पर्धेत, ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांच्या श्रेणीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपले वर्चस्व पुन्हा दाखवून दिले. सुमारे ४७५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या बृहन्मुंबई महानगरात दीड कोटीहून अधिक लोकसंख्या वास्तव्यास आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते समाविष्ट आहेत. त्यासोबत मुंबई महानगराला लागून असलेल्या इतर शहरांमधून दररोज नोकरी-व्यवसाय निमित्ताने कोट्यवधी नागरिक ये-जा करतात. ही सर्व व्याप्ती लक्षात घेतली तर दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन करण्याचे अवाढव्य लक्ष्य महानगरपालिका प्रशासनासमोर असते. वार्षिक सरासरी सुमारे ६ हजार १०० मेट्रिक टन घनकचऱ्याचे व्यवस्थापन मुंबईत केले जाते. हे व्यवस्थापन अधिकाधिक सुलभ आणि पर्यावरणस्नेही व्हावे म्हणून महानगरपालिकेने अनेक पावले उचलली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून लोकसहभाग देखील वाढवला आहे. या सर्व कामगिरीची दखल घेऊन महानगरपालिकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close