
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या सप्टेंबर महिन्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्याच्या महापापाची पुनरावृत्ती करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले असून २४ ऑक्टोबर रोजीच्या परीक्षेचा सुद्धा बट्ट्याबोळ झाला आहे, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालण्याची मागणी करून विद्यार्थ्यांचा मनस्ताप काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील गोंधळ सुरु असतानाच आता लोहमार्ग पोलीस भरती प्रक्रियेतील कॉपी- कांड सुद्धा उघडकीस आले आहे, त्यामुळे राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी भरती परीक्षा नसून विद्यार्थ्यांना ‘शिक्षा’ असल्याची टीका करत, मुख्यमंत्री महोदय राज्यातील युवकांना वेठीस धरणे कधी थांबवणार? असा खडा सवाल भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
अर्थपूर्ण संवाद करत बोगस कंपनीला कामे द्यायची आणि त्यातून गोंधळ निर्माण करायचा हाच महाविकास आघाडी सरकारचा ‘भ्रष्टाचारी पॅटर्न’ बनला असल्याचे आरोग्य विभाग व लोहमार्ग पोलीस विभागाच्या भरती प्रक्रियेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ अद्यापही मिटलेला नाही. दुसऱ्यांदा परीक्षा घेताना देखील या तरुणांना मनस्तापच सहन करायला लागत असल्याचं दिसत आहे. अनेक परीक्षार्थींना अर्ज करताना जे केंद्र मागितलं ते मिळालंच नाही. तर याहीवेळी अनेक परिक्षार्थीचे प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ सुद्धा नाही त्यामुळे नक्की परीक्षा कशी द्यायची असे प्रश्न परीक्षार्थींमध्ये पुन्हा एकदा निर्माण झाले आहेत. अशीच अवस्था १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या लोहमार्ग पोलीस भरती प्रक्रियेची सुद्धा झाली, वर्गातील पर्यवेक्षकच गुगलच्या मदतीने उत्तर शोधून ठराविक परीक्षार्थींना ते सांगत होते, तर काही ठिकाणी परीक्षार्थींना चर्चा करून परीक्षा देण्याचा प्रकार करण्यात आला, तर काही परीक्षा केंद्रावर हुशार परीक्षार्थींचे पेपर पाहून इतर परीक्षार्थींचे पेपर सोडविण्यात आल्याचे समोर आले आहे. याही परीक्षेची जबाबदारी आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत गोंधळ घालणाऱ्या कंपनीकडेच देण्यात आली होती. प्रामाणिक परीक्षार्थींना नोकरीपासून दूर ठेवायचे व लाखो रुपये उकळून आपल्या मर्जीतील परीक्षार्थींना नोकरी द्यायची असा प्रकार राज्यात पुन्हा एकदा सुरु झाला असून, यात करोडो रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप आ. भातखळकर यांनी केला.
या दोन्ही भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून याची सखोल चौकशी करण्याची मागणी स्वतः लोकायुक्तांना करणार आहे व आवश्यकता भासल्यास या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोठावणार असल्याचा इशारा आ. भातखळकर यांनी यावेळी दिला आहे