टाॅप न्यूज
चैत्यभूमीत उसळला भीमसागर; लाखो अनुयायांनी केले महामानवाला अभिवादन

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर, शिवाजी पार्क, चैत्यभूमी परिसरात मंगळवारी भीमसागर लोटला. लोकल ट्रेनसह बेस्ट बस, शिवाजी पार्क, दादर परिसरातील रस्ते, चैत्यभूमी, दादर चौपाटी, हिंदू कॉलनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेले राजगृह, वडाळा येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालय आधी परिसर भीममय होऊन गेला. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध मंत्री व राजकीय नेते चैत्यभूमी येथील बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ नतमस्तक झाले. लाखो आंबेडकर अनुयायानी तासनतास रांगेत उभे राहून आपल्या भिमाला अभिवादन केले.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना आपल्या भिमाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे यावेळी मुंबई शहरसह राज्य व देशाच्या कोणाकोपऱ्यातून भीमसैनिक चैत्यभूमीत उतरले होते. महामानवाचे दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायाने सोमवार, ५ डिसेंबर पासूनच रांगा लावल्या होत्या. त्यामुळे दादर स्टेशनपासून चैत्यभूमीकडे अनुयायांचा लोंढाच्या लोंढा सरकत होता. केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, ॲड.प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, उदयनराजे भोसले आदीं मान्यवरांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. आपल्या भिमाच्या दर्शनासाठी दादर रेल्वे स्टेशनवर अनुयायाने खचाखच भरून लोकल दाखल होत होत्या. त्यामुळे दादर रेल्वे स्टेशन परिसर निळामय होऊन गेला होता. पांढरे शुभ्र कपडे, डोक्यात निळी टोपी, खांद्यावर निळी उपरणे घालून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरचे भीम दर्शनाचे भाव दिसून येत होते. कडक ऊन असतानाही अनेकांनी कोणताही गोंधळ न घालता रांगेतच आपल्या भिमाचे दर्शन घेतले. यावेळी हेलिकॉप्टर मधून डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र सैनिकांनी योगदान दिले. त्यापैकी एक सूर्या सारखे चमकणारे नाव म्हणजे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेबांनी दलित, पीडित, वंचितांसाठी भरीव असे काम संविधानाच्या माध्यमातून केले. त्यांना एकप्रकारे संजिवनी देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला आहे. आज कोणीही या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघू शकतो. हे आज बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच शक्य झाले अशी भावना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण आंबेडकर यांच्यामुळेच जगामध्ये ताठ मानेने उभे आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे सर्वसामान्यांना अधिकार प्राप्त झाले. त्यांना जगण्याचा हक्क मिळाला. सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊ शकला. राज्यातही माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकला. मला राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झाले. मी बाबासाहेबांचा शतश: ऋणी आहे. इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री यांनी दिले.
शिवाजी पार्कवर पुस्तकांचा महामेळा –
दादर, शिवाजी पार्क, चैत्यभूमीवर अनुयायांची रीघ लागली होती. येथे दाखल अनुयायांना पुस्तकांची खरेदी करता यावीत, म्हणून शिवाजी पार्क मैदानात पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले होते. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे, वर्धा आणि अलिगड येथील प्रकाशन संस्थांचा पुस्तके विक्रीमध्ये समावेश होता. तसेच बाबासाहेब, गौतम बुध्द, महात्मा फुले, शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तैलचित्र घेण्यासाठीही भीम सैनिकांची गर्दी होती. याबरोबर मुंबईतील विविध ठिकाण्याहून आलेल्या भीम सैनिकांकडून शिवाजी पार्कमधील आंबेडकरी आनुयायांनी मोफत भोजन, पाणी आणि चहा, बिस्कीट वाटप करण्यात आले.
आंबेडकरी गाण्याने चैत्यभूमी दुमदुमली –
शिवाजी पार्कवर राज्यभरांतून आलेल्या शाहीर आणि गायकांनी आंबेडकरी गाण्यांनी शिवाजी पार्क दूमदुमले होते. यामध्ये काही गायक हे अंध, अपंग होते. त्यांनीही ढोलकीच्या तालावर आंबेडकरी गाणे गायली. त्यामुळे आंबेडकर अनुयायांमध्ये एक उत्साह दिसून येत होता.