राजकिय

कोकणवासियांना शिंदे-फडणवीस यांनी ‘प्राधिकरणा’च्या माध्यमातून दिलासा द्यावा

आमदार प्रविण दरेकराची मागणी

गोरेगाव येथील नेस्को मैदानात भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी भाजपा आमदार आणि विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी कोकण विकास प्राधिकरणाची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. शिंदे आणि फडणवीस यांनी ‘प्राधिकरणा’च्या माध्यमातून कोकणवासियांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी केली. या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात कोकणवासियांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, गेल्या तीन-चार महिन्याच्या कालावधीत तीन-चार वर्षालाही मागे टाकेल अशा प्रकारचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरु आहे. कोकणने शिवसेनेला भरभरून दिले. दुर्दैवाने शिवसेनेने ज्या पद्धतीने या कोकणची उतराई व्हायला हवी होती. अगदी त्या ठिकाणी कोकणच्या गोव्याच्या बॉर्डरपासून पनवेलपर्यंत शिवसेनेच्या सरपंचापासून आमदार, खासदार, लोकसभेच्या अध्यक्षांपर्यंत कोकणच्या मातीने दिले. कोकणला शिवसेनेने काय दिले याचे उत्तर याठिकाणी आजही सापडत नाही. आज राज्याचे प्रमुख म्हणून आपण दोघेही या महोत्सवाच्या ठिकाणी आहात. विधिमंडळ सभागृहात सातत्याने मी मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समोर असताना सांगितलेले की, उद्धव ठाकरे तुम्हाला कोकण माफ करणार नाही. कोकणाने आपल्याला भरभरून दिले आहे. परंतु पाझर फुटला नाही. त्याचा परिणाम मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना राज्याची धुरा घ्यावी लागली. म्हणून माझी विनंती आहे की, कोकण विकास प्राधिकरणाची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. एक स्वतंत्र प्राधिकरण त्यात टुरिझम असेल, फलोत्पादनाला चालणा देणाऱ्या गोष्टी असतील आणि एकंदर कोकणचा सर्वांगीण विकास त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून होऊ शकतो. आपण कोकणवासियांना एक सुखद दिलासा या प्राधिकरणाच्या माध्यमातून द्यावा ही आमची आग्रही मागणी असल्याचे दरेकर यावेळी म्हणाले.
यापुढे आ.दरेकर म्हणाले, संजय यादवराव हे अनेक चांगल्या कल्पना राबवतात. त्यांनी पनवेलपासून स्वराज्य भूमी यात्रा काढली होती. या यात्रेला मी गेलो होतो. ती यात्रा जिथे जिथे स्वातंत्र्य सेनानी असतील, लढणारे वीर, थोर पुरुष असतील त्या सर्व ठिकाणी पोचली. त्यांची स्मृतीस्थळे व्हावी अशा प्रकारची संकल्पना मांडली होती. त्यांनी ज्या ज्या शहराची नावे घेतली तिथली स्मृतीस्थळे, त्यांचे देशासाठी काय योगदान आहे, समाजासाठी काय योगदान आहे हे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना कळू शकेल यासाठी आपण शासन म्हणून लक्ष घालावे, अशी विनंतीही दरेकर यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच या कार्यक्रमाला अक्षरशः सरकार आले आहे. त्यामुळे कोकणवासियांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. दातृत्व मानणारा आणि करणारा मुख्यमंत्री या राज्याला लाभला आहे. त्यांच्या कारकिर्दीत कोकणचा विकास झालेला दिसेल आणि कोकणाला समाधान मिळेल, अशी आशाही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close