मुंबई

मुंबई महापालिकेत कॅगचे ऑडिटसाठी डिसेंबर अखेरीपर्यंत डेडलाईन

शिंदे – फडणवीस सरकारच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकेतील कोरोना काळातील १२ हजार कोटींच्या आर्थिक व्यवहाराचे कॅगने ऑडिट सुरु केले आहे. हे ऑडिट पूर्ण करण्यासाठी कॅगकडून डिसेंबर अखेरीपर्यंतची डेडलाईन ठेवण्यात आली आहे. कॅगला पालिका प्रशासन सहकार्य करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. कॅगला पालिकेशी संबंधित माहिती देण्यासाटी एकूण पाच टीम असून एका टीममध्ये पाच अधिका-यांचा समावेश आहे. ऑडिट करताना पालिकेतील संबंधित कर्मचारी, अधिका-यांना उपस्थित राहावे लागणार आहे. बदली व निवृत्त झालेल्या कर्मचारी, अधिका-यांनाही बोलावले जाणार आहे.
कॅगकडून २८ नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान झालेल्या व्यवहाराची चौकशी केली जाणार आहे. कोरोना काळात निविदा प्रक्रिया न राबवता कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देण्यात आली. यात आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यात आली होती. कोरोना काळात वैद्यकीय साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले. या काळात समित्यांच्या बैठकाही बंद होत्या. त्यामुळे खरेदीसाठी स्थायी समितीने पालिका आयुक्तांना अधिकार दिले होते. पालिकेच्या जवळपास १० खात्यांमधून झालेले व्यवहार संशयाच्या फे-य़ात असून ते कॅगच्या रडारवर आहेत. या व्यवहारांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता. विधीमंडळ अधिवेशनातही यावर आवाज उठवण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेच्या व्यवहाराची चौकशी कॅगमार्फत करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार कॅगने ऑडिट सुरु केले आहे.
कॅगच्या पाच टीम असून प्रत्येक टीममध्ये पाच अधिकारी असणार आहेत. कोरोना काळात आर्थिक व्यवहार झाला त्यावेळी असलेल्या संबंधित खात्यातील अधिकारी, कर्मचा-यांनाही हजर राहण्यासाठी सांगितले जाणार आहे. यातील आता बदली झालेल्या शिवाय निवृत्त झालेल्या कर्मचारी, अधिका-यांनाही बोलावले जाणार असल्याचे सांगण्यात आले.  कोरोनातील विविध उपायोजना व खरेदीसाठी झालेला खर्च, तीन रुग्णालयांमध्ये करण्यात आलेली खरेदी, चार पुलांच्या बांधकामावरील खर्च, दहिसर येथे अजमेरा बिल्डरच्या भूखंडाची खरेदी,  तीन मलनि:सारण प्रक्रिया केंद्रासाठी खर्च, मुंबईतील ५६ रस्त्यांच्या दुरुस्तीचा खर्च,  सहा सांडपाणी प्रकल्पांवर खर्च तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांवरील खर्च या आर्थिक व्यवहारांचे ऑडिट केले जाणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close