मुंबई

मुंबईच्या सौंदर्यीकरणाला फेब्रुवारी उजाडणार

शिंदे – फडणवीस सरकारच्या आदेशानंतर मुंबईचे सौंदर्यीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली. मात्र सौंदर्यीकरणाच्या कुठल्याच कामाची प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मुंबईच्या सौदर्यीकरणाला फेब्रुवारीपर्यंत तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत सौंदर्यीकरणाचे ५० टक्के काम कागदावरच अनुभवता येणार आहे. आतापर्यंत फक्त  १८ कामांची वर्क ऑर्डर दिली असून एकूण ५५० कामांची नोंद झाली आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत सौंदर्यीकरणाचे काम सुरु होईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
राज्य सरकारने डिसेंबर अखेरपर्यंत ५० टक्के मुंबईचे सौंदर्यीकरण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेनेही सौदयीकरणाच्या कामाला लागली. त्यासाठी १,७२९ कोटींची तरतूद केली. पालिकेच्या मध्यवर्ती खात्याच्या माध्यमातून निविदा मागवण्यात येत असून वॉर्ड स्तरावरील कामासाठी सहायक आयुक्त निविदा मागवत आहेत. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत सौंदर्यीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल आणि फेब्रुवारीत मुंबईकरांना मुंबईचे सौंदर्यीकरण न्याहळता येणार आहे.
या कामांचे होणार सुशोभिकरण –
मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत  रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक जंक्शन, उद्यान, समुद्र किनाऱ्यांचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, आकर्षक रंगीबेरंगी रोषणाईची  कामे करण्यात येणार आहेत. रस्त्यांची कामे वगळता पालिका इतर सौंदर्यीकरणाची कामे विभागीय स्तरावर पूर्ण करणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाला ३० कोटींपर्यंत निधी दिला जाणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक विभागाला १० कोटी देण्यात आले आहेत. त्या अंतर्गत दुभाजकांवर हिरवळ तयार करणे, विजेचे खांब उभे करणे या कामांना सुरुवात केली जाणार आहेत. तसेच जे जे उड्डाणपूलाखालील ५५ खांबांचेही सौंदर्यीकरण करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close