शैक्षणिक

आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी ५० शिक्षकांना जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने एकूण ५० शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. लवकरच या शिक्षकांना समारंभपूर्वक गौरवण्यात येईल. अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस आहे. त्यांची स्मृती  चिरंतन राहावी  म्हणून या दिवशी “आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने” महानगरपालिकेच्या शिक्षकांना दरवर्षी  सन्मानित करण्यात येतो.
शिक्षण विभागातील  महानगरपालिका  प्राथमिक  व  माध्यमिक  शाळा, खासगी  अनुदानित  व विना-अनुदानित  प्राथमिक  शाळांमधील जे  शिक्षक  ज्ञानदानाचे  व  विद्यार्थी  घडविण्याचे  पवित्र  कार्य प्रामाणिकपणे  करीत  आहेत,  त्यांचा  यथोचित  गौरव  करण्याची  परंपरा  सन १९७१  पासून  ०२ शिक्षकांना पुरस्कृत  करुन  सुरु  झाली. त्यानंतर वेळोवेळी  यामध्ये बदल  होऊन आजमितीस ५० आदर्श  शिक्षकांना “महापौर  पुरस्काराने” गौरविण्यात  येत आहे.
सन २०२१-२२ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्यासाठी महानगरपालिका  प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विना-अनुदानित प्राथमिक शाळांतील एकूण १०३  शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विना-अनुदानित प्राथमिक शाळांतील आदर्श आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे व्रत स्वीकारलेल्या या ५० शिक्षकांना प्रत्येकी रुपये १० हजार (ECS द्वारे बँकेत जमा), बृहन्मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व फेटा देऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका (पूर्व उपनगरे)  आश्विनी भिडे यांच्या हस्ते  सन्मानित  केला जाणार  आहे.
संविधानिक कारणास्तव यावर्षी महापौर हे पद रिक्त आहे. मात्र, ५० वर्षांची परंपरा खंडित होऊ नये म्हणून हे पद रिक्त असूनही त्याच नावाने हा पुरस्कार देणे संयुक्तिक होणार आहे.
यावेळी उप आयुक्त (शिक्षण) श्री. केशव उबाळे, शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ, श्री. राजू तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close