राजकिय

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी अंबादास दानवे यांची नियुक्ती

शिवसेनेची मराठवाड्यातील तोफ म्हणून ओळखले जाणारे अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी मंगळवारी निवड करण्यात आली. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी निवडचे पत्र दानवे यांना दिले. शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय भूकंप झाला. शिवसेनेतून बंडखोरी करत मराठवाड्यातील ६ आमदार शिंदे गटात गेले. परंतु आमदार अंबादास दानवे हे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. मराठवाड्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि दानवे हे दोघे शिवसेनेंची खिंड लढवित आहेत.
सत्तांतर झाल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेनेने दावा सांगितलेला होता. मात्र उद्धव ठाकरेंच्या सहीने विधान परिषद सभापतींना पत्र लिहित अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर वर्णी लावावी, अशी शिफारस केली होती. त्यानुसार, मंगळवारी दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून ६ आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणं पसंत केलं. विशेष म्हणजे याच मराठवाड्याला शिंदेंच्या मंत्रिमंडळातही मोठं स्थान मिळालं आहे. त्यातच, औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तिथेच ठाकरेंना जोरदार दणका बसला. अशा परिस्थितीत दानवेंना विरोधी पक्षनेतेपदी संधी देऊन मराठवाड्यात दानवेंच्या रुपाने शिवसेनेला बळ देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close