शैक्षणिक
पालिका शाळेच्या मुख्याध्यापकांना मिळणार नेतृत्व कौशल्याचे धडे

मुख्याध्यापक हा शाळा आणि प्रशासन यांना जोडणारा दुवा असून ‘जसा मुख्याध्यापक तशी शाळा’ हे वास्तव विचारात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजेंट स्टडीज यांच्यामध्ये भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील हॅम्बोल्ट पेंग्विन सभागृहात मुख्याध्यापकांसाठी नेतृत्व कौशल्य कार्यशाळा उद्घाटन समारंभ व सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजु तडवी आणि जेबीआयएमएस संस्थेचे संचालक डॉ. आर. श्रीनिवास अय्यंगार, प्रा. कविता लघाटे, उद्यानाचे संचालक डॉ. संजीवकुमार त्रिपाठी, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी आणि पालिका शाळांचे 120 मुख्याध्यापक उपस्थित होते.

हे प्रशिक्षण तीन महिन्यात 40 सत्रे व 60 तासांत पूर्ण करण्याचा कृतिकार्यक्रम तयार केला असून यामध्ये व्यवस्थापन कौशल्ये, आर्थिक बाबी हाताळणे, विद्यार्थी, पालक, समाज, लोकप्रतिनिधी यांच्याशी सौहार्दपूर्ण वर्तन करणे, संघ भावनेतून काम करण्याचे कौशल्य विकसित करणे, स्व: विकास करणे, शिक्षकांना प्रेरणा देणे, शालेय विकासाचा दुरगामी आराखडा तयार करणे, निर्णय क्षमता वाढवणे, प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर करणे अशा शालेय विकासासाठी आवश्यक विविध बाबींचा समावेश असणार आहे.
या प्रशिक्षणातून मुख्याध्यापकास शाळेचा सीईओ बनविण्याचा व भविष्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका देशाचे नेतृत्व करण्याचा मानस असणार आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी तसेच शाळा आणि व्यक्तिगत विकासासाठी ही कार्यशाळा एक अभिनव उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले. मुख्याध्यापकांना नानाविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे आहे.
तर सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांनी हे प्रशिक्षण प्रत्यक्ष कृतीवर आधारित असल्याने मुख्याध्यापकांनी त्यात सक्रिय सहभागी होण्याबाबत आवाहन केले. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सारख्या नामांकित संस्थांद्वारा मुख्याध्यापकांना असे प्रशिक्षण देणारी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका असल्याचे मत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालती टोणपे (उपशिक्षणाधिकारी) यांनी विशेष योगदान दिले. तर किसन पावडे (प्रशासकीय अधिकारी) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.