टाॅप न्यूज
मालाड पी.नाॅर्थ कार्यालयातील पदनिर्देशक अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

मालाडमधील पालिकेच्या पी.उत्तर विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी पदनिदर्शेक अधिकारी (डीओ) पद गेल्या ६ महिन्यापासून स्वत:कडे घेवून ठेवले आहे. यामुळे पी.उत्तर विभागात अनधिकृत बांधकामे, मोकळ्या जागेवरील भरणी आणि मॅग्रोजची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे या विभागात स्वतंत्र पदनिदर्शेक अधिकारी नियुक्त करण्याची मागणी मालाडवासियांकडून केली जावू लागली आहे.
मालाड पालिका पी.उत्तर विभाग कार्यालयातील इमारत व कारखाने विभागात डिसेंबर २०२१ साली
पदनिर्देशक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता
धमेंद्र कंथारिया यांची बोरिवली आर.मध्य विभागात बदली झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत पी.उत्तर विभागात पदनिदर्शेक अधिकारी यांची खुर्ची रिकामी आहे. या रिकाम्या खुर्चीमुळे मालवणी, मढ, मार्वे, आक्सा, कुरार व्हिलेज या परिसरांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे तसेच मोकळ्या जागेवर अतिक्रमण सुरु आहे. याचा सर्वाधिक लाभ हा येथील भूमाफिया, बांधकाम कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांना होत आहे. सदर पद सहा महिन्यापासून रिक्त असून त्याकडे मुंबई महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त, पश्चिम उपनगरे यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विनोद घोलप यांनी केला आहे.
याविरोधात ते लवकरच महापालिका आयुक्ताकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
इमारत व कारखाने विभागात पदनिदर्शेक अधिकारी हे पद कार्यकारी अभियंता श्रेणीतील आहे. यामुळे या पदावर सहाय्यक आयुक्त पदावरील व्यक्ती राहू शकत नाही. कारण त्यांना तसा अनुभव नसतो. पदनिदर्शेक अधिकारी हे विभाग कार्यालय अंतर्गत
येणारे अनधिकृत बांधकामांना नोटीस देणे, निष्कासन करणे, धोकादायक इमारतीवर कारवाई करणे अशी कामे करतात. पावसाळ्याच्या दृष्टीने हे पद अत्यंत महत्वाचे आहे. या पदासाठी अभियंता असणे गरजेचे आहे. मग इतर वाॅर्डात डीओ हे अभियंता पद कसे आहे. फक्त पी.नाॅर्थ विभागासाठी महापालिकाकडे कार्यकारी अभियंता उपलब्ध नाहीत? असा सवाल पालिका विभाग कार्यालयातील
अधिकारी यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबईतील महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयातील अनधिकृत बांधकामांना लगाम बसावी यासाठी सन २०१९ साली तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी इमारत व कारखाने विभागात एक स्वतंत्र पदनिदर्शेक अधिकारी यांची नेमणूक केली होती. ती अद्यापही अस्त्तित्वात आहे. मात्र पी.उत्तर विभागात या पदाला केराची टोपली दाखविली जात असल्याचे दिसून येत आहे.
पदनिदर्शेक अधिकारी यांची कामे –
विभागातील अनधिकृत बांधकामांवर आणि सहाय्यक व ज्युनियर अभियंता यांच्यावर नियंत्रण ठेवले, विभागात सुरु असलेल्या बांधकामांवर कारवाईचे आदेश देणे, नोटीस देणे तसेच धोकादायक झालेल्या इमारतीचे आॅडिट करणे, नोटीसा देवून खाली करणे, आरटीआयचे आपील पाहणे, हायकोर्टात कायदेशिर बाजू मांडले.
उपायुक्तांचा बोलण्यास नकार –
याविषयी पालिका उपायुक्त, (परिमंडळ – ४) विजय बालमवार यांना विचारले असता, त्यांनी मी रजेवर असल्याचे सांगून फोन कट केला. यामुळे उपायुक्त पदनिदर्शेक अधिकारी पदाविषयी किती गंभीर आहे. हे यावरून दिसून येते.