टाॅप न्यूज

बोरिवलीत रंगल्या श्वानांच्या स्पर्धा; ३०० हून अधिक श्वानांचा सहभाग

बोरिवली पश्चिमेकडील आय सी कॉलनी पेट पार्क येथे शनिवारी पाळीव श्वानांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद मिळत यामध्ये 300 हून अधिक श्वान सहभागी झाले होते. कार्यक्रमात सहभागी श्वानांसाठी विविध स्पर्धा, व्यक्तिमत्त्व विकास आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पेट पार्कमध्ये समर पेट 2022 या स्पर्धेचे आयोजन सायंकाळी 4 ते रात्री 9.30 पर्यंत आयोजित करण्यात आले होते. ओल्ड वाईस ओक मीडिया तसेच शिवसेना शाखा क्रमांक 1 च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर व मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या सहकार्याने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने प्राणीमित्र सहभागी झाले होते. दरम्यान प्राणिमात्रांविषयी प्रेम-आपुलकी निर्माण करण्यासाठी असा उपक्रम सर्वत्र राबवणे गरजेचे असल्याचे मत मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात माँ फाउंडेशनच्यावतीने भटक्या श्वान तसेच लहान पिलांसाठी दत्तक योजना आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी एम एच बी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांना रस्त्यावरील श्वान व मांजरीसाठी रुग्णालय तसेच निवारा उपलब्ध करून दिल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच एम एच बी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल विनायक वरघडे यांना देखील रस्त्यावरील श्वान व मांजरीसाठी वैद्यकीय उपचारासाठी ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, एमएचबी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा,युवा सेनेचे जितेन परमार, दर्शित कोरगावकर सहित प्राणी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओल्ड वाईस ओक मीडियाचे नितीन दिवेकर यांनी केले. दरम्यान शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेतून पाळीव श्वान व  मांजरीसाठी मुंबईतील पहिली स्मशानभूमी दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा भागात बांधण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close