शैक्षणिक

दादरच्या बी.एन.वैद्य उद्यानात पालिकेने सुरु केले मोफत वाचनालय

दादर मधील हिंदू कॉलनीत बी. एन. वैद्य उद्यानात कॉर्पोरेट सामाजिक दायित्‍वच्‍या माध्‍यमातून रविवारपासून मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादरमध्ये खास वैयक्तिक ग्रंथालयाकरीता ‘राजगृह’ या बंगल्याच्या रूपाने निवासस्थान बांधले होते. या राजगृह समोरच सदर उद्यानात हे वाचनालय सुरु केले आहे. या वाचनालयाच्या शुभारंभ प्रसंगी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेच्‍या उद्यान विभागामार्फत विविध उद्यानांमध्‍ये कॉर्पोरेट सामाजिक दायित्‍वाच्‍या माध्‍यमातून, महानगरपालिकेच्‍या २४ प्रशासकीय विभागात प्रत्येकी एक याप्रमाणे २४ वाचनालय टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. या शृंखलेतील तिसऱ्या वाचनालयाचा प्रारंभ रविवारी दादर येथे झाला.
यावेळी उद्यान अधीक्षक परदेशी यांनी सांगितले की, आजच्‍या सोशल मीडिया आणि मोबाईलच्‍या दुनियेत हरविलेल्‍या नव्‍या पिढीला वाचनामध्‍ये रस निर्माण करून एक समृद्ध समाज निर्मितीचा आमचा प्रयत्‍न आहे. या वाचनालयांमध्‍ये विविध महापुरुषांची जीवन चरित्र, इतिहास,निसर्ग विषयक,  वृक्ष-फुले-फळे, आरोग्‍य, चांगली जीवन शैली अश्या निरनिराळ्या विषयांची पुस्तके समाविष्ट आहेत. तसेच लहानग्‍यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास व्‍हावा, या हेतूने विविध बोधपर गोष्‍टी तसेच खेळ आणि व्‍यायामाविषयी आवड निर्माण व्‍हावी म्‍हणून त्‍या संदर्भातील पुस्‍तकेही या वाचनालयांमध्‍ये उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानवंत आणि पुस्तकप्रेमी. राजगृहातील त्यांचे ग्रंथालय देखील खासच. त्यामुळे बाबासाहेबांच्या निवासस्थानासमोर उद्यानात सुरू केलेले मोफत वाचनालय हे वाचन प्रेमींना विशेषतः विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close