शैक्षणिक

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार हायटेक शिक्षण

मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता शिक्षक विभागाकडून हायटेक शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक कार्य करणारी बायजूस संस्था व मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग यांच्यात नुकताच दावोस येथे सामजस्य करार करण्यात आला. दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) झालेल्या या करारामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना बायजूस संस्थेचे ‘लर्निंग ऍप’ व इतर सेवा प्रणाली या विनामूल्य वापरासाठी उपलब्ध होणार आहेत. तर महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना देखील बायजूस संस्थेद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या सामंजस्य करारप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह आणि बायजूस संस्थेचे बायजू रविंद्रन आदींची उपस्थिती होती. तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल‌, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत व दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता व्हर्च्युअल क्लासरूम, डिजीटल क्लासरूम, टॅब, कम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, ऍस्ट्रॉनॉमी लॅब, संगीत- कला- क्रीडा अशा विविध उपक्रमाद्वारे अध्ययन व अध्यापन अविरतपणे करण्यात येत आहे. याच शृंखलेत बायजूस या संस्थेसोबतच्या सामंजस्य कराराच्या निमित्ताने आणखी एक पुढचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना टॅब, मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close