मुंबई

पोयसर नदी पात्रातील बाधित १५ झोपड्यांवर कारवाई; संरक्षण भिंत बांधण्याचा मार्ग मोकळा

पश्चिम उपनगरातील कांदिवली येथील असलेली
 पोईसर नदी पात्रातील अडथळा ठरणा~या १५ झोपड्यांवर पालिका आर.दक्षिण विभागाने शुक्रवारी धडक कारवाई केली. यामुळे पोयसर नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला असून भविष्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोकाही कमी झाला आहे.
पोयसर नदी ही पालिका आर दक्षिण विभागातील परिसरातील मंगूभाई दत्ताजी पुलाच्या जवळ असणा-या लालजी पाडा परिसरातून वाहते. पावसाळ्याच्या कालावधीत अतिवृष्टी दरम्यान नदीलगतच्या परिसरात पाणी भरण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमध्ये नदीच्या किनारी संरक्षक भिंत बांधण्याचाही समावेश होता. मात्र, ही भिंत बांधण्यात सदर परिसरात उद्भवलेल्या काही बांधकामांचा आणि झोपड्यांचा अडथळा येत होता. या अनुषंगाने अतारिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार ‘परिमंडळ – ७’ च्या उप आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या स्तरावर सातत्याने समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात येऊन संबंधितांशी संवाद साधण्यात आला. यानंतर शुक्रवारी सकाळपासून करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील कारवाईदरम्यान १५ बांधकामे व झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान स्थानिकांचे चांगले सहकार्य महानगरपालिका प्रशासनाला लाभले, अशी माहिती पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे उप आयुक्त  उल्हास महाले यांनी दिली आहे.
 पोईसर नदीकाठी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. यासाठी सदर परिसरातील सुमारे १३० बांधकामे व झोपड्या प्रभावीत होणार आहेत. तथापि, येत्या पावसाळ्यापूर्वी ज्या भागात भिंत बांधणे प्राधान्यक्रमानुसार आत्यंतिक गरजेचे आहे, अशा भागातील २९ बांधकामे पहिल्या टप्प्यात हटविण्यात येणार आहेत. या २९ बांधकामांपैकी १५ बांधकामांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली. तर उर्वरित १४ बांधकामे देखील पाठोपाठ हटविण्यात येणार आहेत. ही बांधकामे हटविल्यानंतर लगोलग संरक्षक भिंतीचे बांधकाम देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती आर.दक्षिण विभागातील सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली. या कारवाईसाठी जेबीसी, पोकलेन, २० पोलीस कर्मचारी, ७५ पालिकेचे कामगार, कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी कर्तव्यावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close